मुंबई : शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी शाळा विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे ,असा आरोप पालकांनी केला आहे. वाशी येथील सेक्रेड हार्ट या शाळेत नववी मध्ये शिकणाऱ्या निशित पागरिया या विद्यार्थ्याला जाणून बुजून नववी मध्ये पास झाला असताना नापास केला या कृत्यामुळे मुलाला मानसिक धक्का बसला आहे. वाशी येथील सेक्रेड हार्ट या नामांकित शाळेचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे.


विद्यार्थ्याला मनस्ताप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेच्या  या चुकीमुळे धास्तीने हा घाबरलेला मुलगा शाळेमध्ये जाण्यासाठी तयार नसल्याने पालकांनी थेट शिक्षण खात्याचे दरवाजे ठोठावले आहेत.विशेष म्हणजे या मुलाला पास झाल्याचे सांगून एक आठवडा दहावीच्या वर्गात बसवल्यावर पुन्हा नापास झाल्याचे सांगत पुन्हा नववीच्या वर्गात बसवून पुन्हा शिकण्यास सांगण्यात आल्याने आता पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
निशित पागारिया हा विद्यार्थी अचानक अनुत्तीर्ण झाल्याचे शाळा व्यवस्थापनाने कळवल्याने पालकांना धक्का बसला. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला फर्नांडिस यांना संपर्क साधला मात्र त्यांनी हतबलता व्यक्त केली. शिक्षण अधिकाऱ्यांकडे याविरोधात तक्रार केली मात्र शाळा व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेच्या या गलथान कारभारामुळे घाबरलेला विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याने पालकांनी उच्च स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुलांच्या भवितव्याशी खेळ 


याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला फर्नांडिस यांनी संपर्क साधला असता, त्या शाळेत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.शाळेचा निकाल दहावीमध्ये १०० टक्के लागावा म्हणून मुलांच्या भवितव्याशी शाळा खेळत असल्याचा आरोप पालकांनी केलाय.


मनमानीविरोधात लढाई  


हा मुलगा पास असल्याचा शिक्षकांनी केल्याचा ठोस दावा पालकांनी केला आहे.मात्र कारवाई  होण्याच्या भीतीने हे शिक्षक बोलण्यास तयार नसल्याने मुलाचे भवितव्य धोक्यात आले आहे. शाळेच्या या मनमानी विरोधात पालकांनी आता अखेरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.