Corona Third Wave : सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नको, Task Force चा इशारा
राज्य सरकार टास्क फोर्सच्या सूचनेचा विचार करणार का?
मुंबई : राज्यात कोरोनाचं (Corona) प्रमाण काही अंशी घटताना दिसत असल्याचं चित्र पाहत राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं 17 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल असणाऱ्या भागांमध्ये सर्व कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचं पालन करत शाळा सुरु होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली होती. पण, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरु व्हायला नकोत, अशा इशारावजा सूचना टास्क फोर्सनं राज्य सरकारला केल्या आहेत.
लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय हा ऑक्सिजनच्या निकषांवर आधारित आहे, असं टास्क फोर्सनं मनसेच्या पत्रावर उत्तर देत ही प्रतिक्रिया दिली. शाळा सुरु करण्यासाठी वर्गातील मुलांचे दोन गट करुन आठवड्यातून दोन दिवस शाळा सुरु करता येईल का, असा प्रश्न मनसेकडून करण्यात आला होता. यावर उत्तर देत टास्क फोर्सनं या सूचना केल्या.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्यातील शाळा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरु करु नयेत अशा सूचना टास्क फोर्सनं राज्य सरकारला केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घातलेल्या विविध निर्बंधांबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही प्रश्न उपस्थित करत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना पत्र पाठवलं होतं. ज्यावर डॉ. ओक यांनी लेखी स्वरुपात उत्तर देत काही गोष्टी अधिक स्पष्टपणे मांडल्या. त्यामुळे आता राज्य सरकार पुन्हा एकदा टास्क फोर्सच्या या इशाऱ्याचा विचार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, एकिकडे शाळांबाबतचं चित्रच स्पष्ट नसताना तिथं राज्य सरकारकडून महाविद्यालयं सुरु करण्याचीही तयारी दाखवण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीच काही दिवसांपूर्वीच राज्यात महाविद्यालयं सुरू करण्यात येतील असं सूचक वक्तव्य केलं होतं. 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या काळात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान मागील काही दिवसांपासून सुरु असणारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आणि त्यानंतर आता राज्यात वाढणारे डेल्टाचे रुग्ण पाहता शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग परिस्थितीचा पुनर्विचार करुन शाळा आणि महविद्यालयांबाबत सावधगिरीचा निर्णय घेणार का याकडेच विद्यार्थी आणि पालकांचंही लक्ष असणार आहे.