सायन्स एक्स्प्रेसमधील प्रदर्शन पाहण्यास विद्यार्थ्यांची गर्दी
ही रांग बघितल्यावर सिद्धीविनायक किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या ओढीनं भाविक उभे आहेत, असं वाटेल.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ही रांग बघितल्यावर सिद्धीविनायक किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या ओढीनं भाविक उभे आहेत, असं वाटेल.
अरेच्चा... हे तर रेल्वे स्टेशन दिसतंय ! मग ही गर्दी तिकिटासाठी असावी बहुदा, असं तुम्हाला वाटू शकतं..
तुमचे दोन्ही अंदाज साफ चुकलेत. ही गर्दी आहे विज्ञाननिष्ठ मुंबईकरांची... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं उभ्या असलेल्या सायन्स एक्सप्रेसला भेट देण्यासाठी ४-५ तासांपासून हे मुंबईकर इथं उभे होते.
शनिवारी एक भली मोठी रांग लागली होती. अगदी 5-5 तास या रांगेत थांबून लोक दर्शन घेत होते.
बाहेर धो धो पाऊस पडत असताना, वातावरण बदल या विषयावर प्रदर्शन असलेली ही सायन्स एक्सप्रेस पाहण्यासाठी झालेली गर्दी हा आगळाच योगायोग ठरला. विज्ञानामधले नवनवे शोध, प्रयोग पाहण्यासाठी मुंबईसह उपनगरांमधले विद्यार्थी इथं आले.
विद्यार्थ्यांची जिज्ञासापूर्ती करण्याकरता 4-5 तास रांगेत उभं राहिल्याचं सार्थक झाल्याची भावना पालक, शिक्षकांनी बोलून दाखवली. तर विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनीचा फायदा झाल्याचं सांगितलं.
चार दिवसांत दोन लाखांहूनही अधिक लोकांनी या सायन्स एक्सप्रेसला भेट दिली. या विज्ञानप्रेमी गर्दीचं नियोजन करताना आरपीएफचीही चांगलीच दमछाक झाली.
२४ आणि २५ जुलैला या science express चा मुक्काम नाशिकमध्ये असणार आहे.