मुंबई : पीएमसीप्रकरणानं आणखी एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. फतमल पंजाबी या 59 वर्षीय खातेदाराचा आज दुपारी मृत्यू झाला. त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. फतमल पंजाबी यांचं इलेक्ट्रॉनिक्स शॉप आहे. त्यांचा पीएमसी बँकेमध्ये खातं होतं. बँकेचा गैरव्यवहार समोर आल्यानंतर फतमल तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पीएमसी बँक प्रशासनाच्या कारभारामुळे आतापर्यंत दोघांचा बळी गेला. असे आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे असा सवाल नागरिक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी संजय गुलाटी या पीएमसी बँक खातेदाराचा मृत्यू झाला होता. सोमवारी मुंबईत किला कोर्टासमोर झालेल्या रॅलीनंतर संजय गुलाटी अंधेरी पश्चिमेतील घरी गेले. जेवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तात्काळ कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. संजय गुलाटी जेट एअरवेजचे कर्मचारी होते. मात्र त्यांचं काम थांबवण्यात आले होते. त्यातच बँकेत पैसे अडकल्याने ते त्रस्त होते.


बँकेत गैरव्यवहार झाल्याने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सगळ्याच खातेदारांना आणि ज्यांचे बँकेत पगार व्हायचे त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिवसाला केवळ १००० रूपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. तेव्हा रिझर्व्ह बँकेने पहिल्या टप्प्यात ही मर्यादा १० हजार आणि त्यानंतर २५ हजारापर्यंत वाढवली होती. परंतु, तरीही खातेधारकांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुंबईत आल्या असताना संतप्त खातेधारकांनी त्यांच्यासमोर निदर्शनेही केली होती. त्यावेळी निर्मला सीतारामण यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. त्यामुळे आता खातेधारकांना दिवसाला बँकेतून ४० हजार रुपये काढता येतील.