मुंबई : टाटा कर्करोग रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ४० बाल कर्करुग्णांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतची सकाळ आनंदात घालवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लहानग्या बालकांना पाहून राज्यपाल भारावले होते. त्यांनी त्या मुलांशी संवाद साधत त्यांना खाऊ वाटला. तसेच या बच्चे कंपनीला राजभवनाची सैर करवली. राजभवनात आलेल्या या बाल कर्करुग्णांनी समुद्र आणि मोर प्रथमच पाहिल्याने मुले आनंदी झाली होती.


टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या इम्पॅक्ट फाउंडेशनतर्फे बालरुग्णांच्या राजभवन भेटीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी या मुलांशी संवाद साधताना आई-वडील आपल्यावर जितके प्रेम करतात तितकेच प्रेम उपचार करणारे डॉक्टर्स देखील करतात. डॉक्टर्स हे देवाचेच रूप असतात असे सांगून कर्करोगातून लवकर बरे होऊन गरीब आणि गरजू लोकांची सेवा करावी असे राज्यपालांनी सांगितले.


टाटा रुग्णालयात गेल्या वर्षभरात नोंदणी झालेल्या १ लाख रुग्णांपैकी १८०० बालरुग्ण आहेत. या मुलांचे लवकर रोगनिदान झाले तर कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण वाढते अशी माहिती टाटा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टर अनिशा चक्रवर्ती यांनी राज्यपालांना दिली. तर, इम्पॅक्ट फाउंडेशनच्या जान्हवी सावंत यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.