मुंबई : मराठी पत्रकारितेत 'अग्रलेखांचे बादशहा' म्हणून ओळखले जाणारे लेखक नीलकंठ यशवंत खाडिलकर यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. दैनिक नवाकाळचे ज्येष्ठ संपादक खाडिलकर यांचे आज 22 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. खाडिलकरांनी त्यांच्या अग्रलेखातून अन्यायाविरूद्ध लिखाण केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ६ दशके सातत्याने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे खाडिलकर आज काळाच्या पडद्या आड गेले . अग्रलेख , प्रॅक्टिकल सोशिलीसम आणि आपल्या भारधार वक्तृत्वाने खाडिलकरांनी 'नवाकाळ'ची कीर्ती साता समुद्रापार पोहोचवली. सामान्य जनतेचा तोफखाना अशी खाडिलकरांची ओळख आज काळाच्या पडद्याआड गेली.


नीलकंठ खाडिलकरांचा 6 एप्रिल 1934 रोजी जन्म झाला. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि 'केसरी' चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.


अग्रलेखांचा बादशहा’ ही नीलकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीलकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.


खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्ष संपादक होते. या काळात त्यांनी महत्वाच्या घडामोडींवर अग्रलेखातून भाष्य केलं. दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमी, मरीन लाईन्स स्टेशनसमोर त्यांचावर अंत्यसंस्कार विधी केला जाणार आहे. नवाकाळ कार्यालय खाडिलकर रोड गिरगाव येथे दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.