मुंबई: कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात अभूतपूर्व घसरण पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) बाजार उघडल्यानंतर १० टक्क्यांनी कोसळल्यामुळे बाजारात लोअर सर्किट लागले. त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीचे व्यवहार ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात आले. आता १० वाजून २० मिनिटांनी शेअर बाजाराचे व्यवहार पुन्हा सुरु होतील. यानंतर काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २१ जानेवारी २००८ रोजी भांडवली बाजारात शेवटचे लोअर सर्किट लागले होते. निफ्टीपाठोपाठ सेन्सेक्समध्येही आज ३००० अंकांची घसरण पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, अशी प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ अभिजित केळकर यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. शेअर बाजारात एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त मुव्हमेंट होते तेव्हा विपरीत परिणाम टाळण्यासाठी अशाप्रकारचे सर्किट लागते. सध्या बँकिंग आणि आयटी क्षेत्राचे समभाग मोठ्याप्रमाणावर घसरले आहेत. आगामी काळातही या दोन्ही क्षेत्रांतील समभागांत घसरण अपेक्षित आहे. मात्र, अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत काय घडणार, यावर भारतीय शेअर बाजाराचे भवितव्य अवलंबून असल्याचे अभिजित केळकर यांनी सांगितले. 



२००८ नंतर शेअर बाजारात पहिल्यांदाच लोअर सर्किट लागले आहे. बाजार उघडल्यानंतर Nifty 50 ने ९६६.१० अंकांची घसरण नोंदवत ९००० पेक्षा खालची पातळी गाठली. तर सेन्सेक्समध्ये तब्बल ३००० अंकांची घसरण पाहायला मिळाली.