मुंबई : शिवसेना आणि विरोधकांपुढे झुकत सरकारनं अखेर अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावल्याच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्थगिती दिल्याची घोषणा केली. नेहमी शिवसेनेला खिंडित गाठणा-या भाजपला माघार घ्यावी लागल्याचं दुर्मिळ चित्र यानिमित्तानं दिसलं. शिवसेनेला गोंजारण्यासाठीच हा हे निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. 


अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी कामकाज सुरू होताच मु्ख्यमंत्र्यांनी विधानसभेत याप्रकरणी निवेदन केलं. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन तूर्तास मेस्मा स्थगित करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावणे चुकीचं असल्याचा विरोधकचं म्हणणं होतं. मेस्मा हटला नाही, तर कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. सरकारनं एक पाऊल मागे घेतल्यानं तिढा सुटलाय.  


मातोश्रीनं कान टोचल्याचा खोचक टोला


मातोश्रीनं कान टोचल्यावर स्थगिती दिल्याचा खोचक टोला विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी लगावला. मात्र यामुळं मेस्माबाबत पंकजा मुंडेंचं जोरदार समर्थन करणारे चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे हे ज्येष्ठ मंत्री तोंडघशी पडल्याचं दिसून आलं.  


नेचर पार्कला पुनर्विकासातून वगळला


आजचा दिवस फडणवीस सरकारसाठी माघारीचा दिवस ठरलाय. आज दिवसभरात सरकारला तीन निर्णयांवर माघार घ्यावी लागली.  अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि विरोधकांच्या आक्रमक विरोधानंतर स्थगिती द्यावी लागली. तर आदित्य ठाकरेंनी माहिमच्या नेचर पार्कला पुनर्विकासातून वगळण्याची मागणी केल्यानंतर त्याबाबत तात्काळ घोषणा सरकारनं केली. 



कृषीपंपाचं कनेक्शन तोडणार नाही!


तसेच विरोधकांच्या मागणीनंतर थकबाकीदारांच्या कृषीपंपाचं कनेक्शन तोडण्याची कारवाईलाही मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली.  नेहमी शिवसेनेला खिंडित गाठणा-या भाजपला माघार घ्यावी लागल्याचं दुर्मिळ चित्र यानिमित्तानं दिसलं. 


शिवसेनेला गोंजारण्यासाठीच हा हे निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर एनडीएतल्या इतर घटकपक्षांची नाराजीही उफाळून आली होती. त्यामुळे आता भाजपनं शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.