मुंबई : आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार ते आता स्पष्ट झाले आहे. एकणू ५७ मंत्री मोदींच्या टीममध्ये असणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला सात मंत्रीपदे आली आहेत. यात चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पदे आहेत. केंद्रात महाराष्ट्राला झुकते माप मिळाले आहे. मात्र, आगामी सहा महिन्यांवर येऊन ठेवलेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मंत्री पदे देण्यात आल्याचे बोलले जात आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेल्या नेत्यांना गुरुवारी सकाळपासून फोन येण्यास सुरुवात झाली. मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील सात नेत्यांना स्थान मिळाले आहे. यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, पियूष गोयल, अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांचा समावेश आहे. यातील गडकरी, जावडेकर, आठवले आणि गोयल यांनी याआधीही केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवले आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 



दरम्यान, शिवसेनेच्या वाट्याला किमान तीन मंत्रीपदे येतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, एकच कॅबिनेट पद मिळाले आहे. आधीच्या सरकारमध्येही शिवसेनेला एकच कॅबिनेट पद देण्यात आले होते. शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे सेनेला थोडे झुकते माफ मिळेल अशी आशा होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही.



कॅबिनेट मंत्री


-  नितीन गडकरी, नागपूर


-  अरविंद सावंत - मुंबई


-  प्रकाश जावडेकर, पुणे


-  पीयूष गोयल, मुंबई


राज्यमंत्री


-  रावसाहेब दानवे - जालना


-   रामदास आठवले - (राज्यसभा)


-   संजय धोत्रे - अकोला