मुंबई: उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल असून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नाही, अशी टीका भाजप नेत्या शायना एनसी यांनी केली. शायना एनसी सोमवारी भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिल्यामुळे याठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. उर्मिला यांना राजकारणाची चांगलीच जाण असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.त्यामुळे भाजप या मतदारसंघात कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यासाठी पक्षाचे अनेक नेते याठिकाणी प्रचाराला येत आहेत. शायना एनसी यांनी सोमवारी भाजपच्या अन्य नेत्यांच्या साथीने प्रचार केला. यावेळी त्यांनी मतदारांना गोपाळ शेट्टी यांना निवडून देण्याचे आवाहन केले. शायना एनसी यांनी म्हटले की, नागरिकांनी नीट पारखलेल्या उमेदवारालाच मतदान करावे. गोपाळ शेट्टी यांची संसदेतील कामगिरीही उत्तम आहे. त्यांनी उत्तर मुंबईतील अनेक प्रश्न संसदेत मांडले. संसदेत त्यांची उपस्थितीही १०० टक्के आहे. याउलट उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी त्यांना मत देऊ नका. उर्मिला यांना प्रत्यक्ष कामाचा कोणताही अनुभव नाही, याकडे शायना एनसी यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी गोपाळ शेट्टी यांनीही उर्मिला मातोंडकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. ऊर्मिला मातोंडकर या सिनेतारका असल्याने त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे वादही निर्माण झाला होता.