Maharashtra Politics : अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठेला विरोध करणारे उत्तराखंडच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya Swami Avimukteswarananda) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आशीर्वाद दिले. सोमवारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची विधीवत पाद्यपूजा करण्यात आली. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी शंकराचार्यांचं पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला... अनेक शिवसेना नेते या पाद्यपूजन सोहळ्याला मातोश्रीवर हजर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शंकराचार्यांनी ठाकरे कुटुंबाला आशीर्वाद दिलेच. शिवाय उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, असं राजकीय वक्तव्य शंकराचार्यांनी केलं. हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही, उद्धवजी यांना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताने दूर केलं त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला आहे असं शंकराचार्य म्हणाले.  पण यावरुन आता वादाची नवी ठिणगी पेटलीय. शंकराचार्यांच्या विरोधात श्री पंचनाम जुना आखाडाचे महंत नारायणगिरी मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरेंनीच देवेंद्र फडणवीस आणि हिंदू समाजाला धोका दिला, असा प्रत्यारोप महंत नारायणगिरींनी (Mahant Narayangiri) केलाय. 


उद्धव ठाकरेंवरून शंकराचार्य आणि महंत आपापासात भिडलेच. शिवाय शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातही टीकेचा सामना रंगला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली, हा विश्वासघात नव्हता का असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी उपस्थित केला. तर उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताने मुख्यंत्रीपदावरुन दूर करण्यात आलं. त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला, हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुर शंकराचार्य यांनी म्हटलं आहे, यावरुन काही लोकांच्या पोटात पोटशुळ उठला असेल असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय.


अयोध्या राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांनी विरोध केला. त्यावेळी पंतप्रधान मोदी समर्थकांनी शंकराचार्यांनाच टीकेचं धनी केलं. आता तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, अशी राजकीय भूमिका शंकराचार्यांनी घेतलीय. त्यामुळं वादाचं वादळ उठलं नसतं तरच नवल.