मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजच्या राजकीय घडामोडींवर दुपारी 12.30 वाजता भूमिका मांडणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. चव्हाण सेंट्रलला दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय भूकंप आला. अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा होता का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण शरद पवारांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले



अजित पवार शुक्रवारी रात्री 9 पर्यंत महाआघाडीच्या बैठकीत उपस्थित होते, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. तर अजित पवारांनी हा निर्णय कधी घेतला? अजित पवारांनी शरद पवारांना विश्वासात का घेतलं नाही? अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला का? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहे. यावर शरद पवार पहिल्यांदा आपली भूमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शुक्रवारपर्यंतच्या बैठकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र असताना एका रात्रीत नेमकं असं काय झालं? हा प्रश्न सामान्यांना आहे. याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या पत्रकार परिषदेत देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागून राहिलं आहे.