मुंबई: सध्या महाराष्ट्रात सत्तेचा जो पेच किंवा चक्रव्युह निर्माण झाला आहे त्यामधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना शरद पवार यांची मदत घेत आहे. त्यामध्ये काय गैर आहे, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. याविषयी त्यांना विचारणा करण्यात आली असता राऊत यांनी म्हटले की, आजच्या घडीला देशात शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांचा सल्ला घेतात. मग महाराष्ट्राच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेने त्यांची मदत घेतली तर त्यामध्ये गैर काय आहे, असा सवाल त्यांनी विचारला.  


'उद्धव ठाकरेंचं जवळपास ठरलंय; शिवसेनेला १७५ आमदारांचा पाठिंबा'


तसेच शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. शरद पवार हे खरंतर पंतप्रधानपदाचे दावेदार होते. मात्र, तशी राजकीय समीकरणे जुळून आली नाहीत. मात्र, ते देशाचे नेते आहेत. ते राज्याच्या राजकारणात परतणार नाहीत, हे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आजघडीला देशात त्यांच्यासारखा नेता नाही. शरद पवार हे इतके मोठे आहेत की, मुख्यमंत्रीपद हे त्यांच्यासाठी लहान आहे. ते दुसऱ्या पक्षाचे असले तरी हे मान्य करण्यात मला बिलकूल कमीपणा वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले.


फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौऱ्यावर; तहाची चर्चा लांबणीवर?


संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर उधळलेल्या या स्तुतीसुमनांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील जवळीक वाढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवार आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतील. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.