मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीची एक संयुक्त बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर पार पडली. यानंतर दोन्ही पक्षांनी आपली अधिकृत भूमिका मांडण्यासाठी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना, 'राज्यपालांनी आम्हाला खूप सवड दिलीय' असा टोला शरद पवार यांनी लगावलाय. तसंच राज्यात लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीवर यावेळी दोन्ही पक्षांनी टीका केलीय. तसंच अजूनही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आघाडीची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व मुद्दे स्पष्ट झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल, असंही यावेळी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी म्हटलंय. 


काँग्रेस - राष्ट्रवादीचं संयुक्त पत्रक

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अनेक राज्यांत भाजपाने मनमानी केली आहे. लोकशाही आणि घटनेचा अपमान केला आहे' असं म्हणत अहमद पटेल यांनी भाजपावर कठोर टीका केली. 


यावेळी, काँग्रेस - राष्ट्रवादीनं एक संयुक्त निवेदन काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी सादर केलं. 'शिवसेनेकडून ११ तारखेला अधिकृतरित्या संपर्क करण्यात आला. परंतु, एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी होती, असं म्हणतानाच तिन्ही पक्षांमध्ये आखणी व्यापक चर्चेची गरज असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.



उद्धव ठाकरे बैठकीत काय बाेलले ?


दुसरीकडे, भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी असे दोन्ही पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बैठकीत म्हटलंय. 'भाजपनं जे ठरलंय ते दिलं आणि सांगितले की हे तुमचे मानाचे पान आहे, तर आम्ही जायला अजूनही तयार आहोत. आम्ही युती तोडलेली नाही, त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यानं आम्ही बाजूला झालो आहोत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबतही चर्चा सुरू आहे. राज्यपालांनी भेदभाव केल्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अन्याय होतो तिथं दाद मागायला हवी' असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.