मुंबई  : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाविकास आघाडी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी कट रचत असल्याचे व्हिडीओ विधानसभेत सादर केले. त्यानंतर आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 



सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकिलांची मदत घेतली गेली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना संपण्याचा कसा कट रचला गेला आहे. याचे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवले.
 
 त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. 'एका सरकारी वकिलाच्या कार्यालयातील जवळपास 125 तासांचं रेकॉर्डिंग करण्यात ते यशस्वी झाले, ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग करायचं म्हणजे किती दिवस रेकॉर्डिंग चाललं म्हणजे यासाठी शक्तीशाली यंत्रणा वापरली असल्याची शक्यता आहे'. असे पवार यांनी म्हटले आहे.
 
 दरम्यान, आज अधिवेशन सुरू होताच भाजपच्या आमदारांकडून थेट शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी  करण्यात आली. थेट शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.
 
'प्रवीण चव्हाण कोण है, शरद पवार का दलाल है'...'षडयंत्र करणाऱ्या शरद पवार यांचा धिक्कार असो'...अशा घोषणा भाजप आमदार देत होते.