`मातोश्री`वर पवार- ठाकरे बैठक, क्रोनोलॉजी समजून घ्या....
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या `मातोश्री` या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
दिपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा शिक्का मारून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची भीती महाविकास आघाडी सरकारला वाटत आहे. त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका वाढल्या असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राजभवनवरील फेर्याही वाढल्या आहेत.
सोमवारी दुपारी शरद पवार राज्यपालांना भेटले, राज्यपालांनीच त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं. तर त्यानंतर सायंकाळी भाजपचे खासदार नारायण राणे राज्यपालांना भेटले आणि त्यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यापूर्वी दोन दिवस आधी संजय राऊतही राज्यपालांना भेटून आले होते. त्याआधी भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात केलेल्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारच्या अपयशावर आरोप केले होते. तर भाजपचे नेते राजभवनवर जाऊन महाविकास आघाडी सरकारची तक्रारही करून आले होते.
* मुळात या खलबतांची सुरुवात फार आधीच झाली होती, ज्याची क्रोनोलॉजी खालीलप्रमाणे आहे....
राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमदारकी मिळू नये यासाठीचे प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरुच होते. त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या अर्जाची राज्यपालांकडून टाळाटाळ करण्यात आली होती. त्याचवेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होची.
तो प्रयत्न अपयशी झाल्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार अपयशी असल्याचं वारंवार बिंबवलं जात आहे. भाजपचे नेते वारंवार यासंदर्भात एकिकडे आरोप करत आहेत तर दुसरीकडे राज्यपालांकडे जाऊन सरकारविरोधात तक्रारही करत आहेत.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्ठमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारच्या अपयशाचा पाढा त्यांच्यापुढे वाचला होता. तसं निवेदनमही राज्यपालांना दिलं होतं. त्यानंतर भाजपने सरकारविरोधात आंदोलनही केलं.
इथे राज्यात हे चित्र असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही रेल्वेप्रश्नी ट्विटचा मारा करुन महाराष्ट्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न हाताळणात अपयशी ठरल्याचा आरोप केला. तर, त्यापूर्वी भाजपचेच राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरेंना इशारा देणारं सल्लावजा ट्विट केलं होतं.
वाचा : भारतातील कोरोना प्रादुर्भावाबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
उद्धव ठाकरेंनी आघाडीमधून बाहेर पडावं अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना उद्धवस्त करतील, असा इशारावजा सल्ला स्वामींनी ट्विटमध्ये दिला होता. शिवाय 'कोरोनात्या संकटात राज्यात राष्ट्रपती राजवट हा एकमेव पर्याय ?', या आशयाचा ब्लॉग स्वामींनी ट्विट केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरु असल्याची भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत.
त्यातच सोमवारी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यामुळे या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं.
एकंदर परिस्थितीचा आढावा घेता शरद पवार आणि ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीत याबाबातच चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. कारण, या भेटीनंतर संजय राऊत यांनी केलेले ट्विट सारंकाही सांगून जात आहेत. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. Boomerang...' राऊतांच्या या ट्विटनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या या सर्व हालचालींना उत्तर देण्याची तयारी सुरु केल्याचं म्हणता येईल.