पवारांकडून मुख्यमंत्री पदावर ट्विस्ट, उद्धव ठाकरे तयार नसतील तर...
मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह शरद पवारांनी केलाय. पवारांच्या या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांचीही मान्यता आहे. 'महाविकास आघाडी'चा मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याचं दिसतंय. यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हा प्रश्न आता उरतोय. घडामोडींमधला ट्विस्ट म्हणजे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयार नसतील तर पवारांकडून संजय राऊत यांचं नाव पुढे करण्यात आलंय. परंतु, उद्धव ठाकरे मात्र संजय राऊतांच्या नावासाठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. उद्धव ठाकरे मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसाठी आग्रही आहेत.
...तर मुख्यमंत्री म्हणून संजय राऊतांच्या नावाचा आग्रह
गुरुवारी रात्री झालेल्या चर्चेत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना हा आग्रह केल्याचंही समजतंय. तीन पायांचं सरकार चालवण्यासाठी सोपं होईल, या उद्देशानं पवारांनी उद्धव ठाकरेंना हा आग्रह केलाय. उद्धव ठाकरे ही जबाबदारी घेण्यासाठी उत्सुक नसतील तर संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याचंही पवारांनी सुचवलं आहे. संजय राऊत यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध चांगले आहेत तसंच ते चांगले समन्वयक असल्यानं त्यांचं नाव पवारांकडून सुचवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, पवारांकडून देण्यात आलेल्या या पर्यायासाठीही उद्धव फारसे उत्सुक नाहीत. कारण, शिवसेनेत सुभाष देसाई, दिवाकर रावते असे ज्येष्ठ नेते आहेत तसंच एकनाथ शिंदे, रामदास कदम इत्यादी जनाधार असलेले नेतेही शिवसेनेत आहेत, त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. संजय राऊत यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार करणं म्हणजे शिवसेनेत अंतर्गत बंडाळी स्वत:च पेटवून देण्यासारखं आहे, याचीही जाणीव उद्धव ठाकरेंना आहे.
'५ वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच'
दरम्यान, 'राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार', असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, राज्याचं नेतृत्व करावं अशी जनतेची, सर्व शिवसैनिकांची इच्छा असून त्याला तिन्ही पक्षांची सहमती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिलीय. शिवसेनेला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं सांगत त्यांनी वृत्ताचं खंडन केलं. तसंच मुख्यमंत्रिपद काय इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नसल्याची रोखठोक भूमिका राऊतांनी मांडली.