मुंबई: भीमा-कोरेगाव प्रकरणात स्वत:च्या फायद्याची थिअरी सिद्ध करायला शरद पवार यांनी वेगळ्या चौकशीचा घाट घातला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा अशा स्वतंत्र चौकशीला विरोध केला. ही दोन्ही प्रकरणे एकच आहेत. मात्र, शरद पवार मतांच्या राजकारणासाठी या दोन्ही प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी आग्रही आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपासयंत्रणेकडे (NIA) देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे कौतुक केले. मात्र, एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा ही प्रकरणे वेगळी नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या तपासात ही बाब स्पष्ट झाली आहे. हे सगळे हिंदुत्ववाद्यांनी घडवून आणले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे त्यांना आता हा तपास वेगळ्या दिशेने न्यायचा आहे. सध्या सुरु असलेल्या तपासातून त्यांना हव्या तशा गोष्टी पुढे येणार नाहीत. त्यामुळे शरद पवार यांनी वेगळी थिअरी पुढे करून स्वतंत्र चौकशीचा घाट घातला आहे. त्यासाठीच हा सगळा आटापिटा सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 


एल्गार आणि कोरेगाव भीमा दोन वेगळे विषय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


या प्रकरणात पोलिसांचा तपास चुकीचा असता तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या बाजूने निकाल दिला असता का, असा सवालही यावेळी फडणवीस यांनी विचारला. 


राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोरेगाव-भीमा प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, यानंतर केंद्र सरकारने हा तपास राज्य सरकारकडून काढून NIA कडे सोपवला होता. यानंतर महाविकासआघाडी सरकारने भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद या दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास होणार असल्याचे जाहीर केले होते.