अन पवार साहेब वानखेडे स्टेडियम मध्ये अचानक अवतरतात तेव्हा !!!!
वानखेडे स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात एकदिवसीय सामना सुरु होता...या सामन्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उपस्थिती लावून या खेळातून अजून आपण निवृत्ती घेतली नसल्याचंच जणू सूचित केलं...
दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : वानखेडे स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात एकदिवसीय सामना सुरु होता...या सामन्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उपस्थिती लावून या खेळातून अजून आपण निवृत्ती घेतली नसल्याचंच जणू सूचित केलं...
लोढा समितीच्या शिफारसिंमुळे पवारांना MCA अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजप मुंबई अध्यक्ष आणि MCA चे उपाध्यक्ष आशीष शेलार यांनी पवार यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली होती. पण अजूनही MCA वर आपलंच नियंत्रण असल्याचे जणू संकेतच पवार यांनी काल दिले...
क्रिकेट सामना सुरु होण्याच्या अगदी काही वेळ आधी त्यांनी MCA च्या विद्यमान मॅनेजमेंट कमिटीला ते येत असल्याची कल्पना दिली...त्यानंतर स्टेडियमच्या प्रेसिडेंट बॉक्समध्ये पवारांचेच राज्य होते. सर्व कमिटी मेंबर्सचा पवारांच्या भोवती गराडा होता.
पवार यांनी कुटुंबियांसह क्रिकेट सामन्याचा आस्वाद लुटला. नात रेवती आणि जावई सदानंद सुळे तसेच पुतणे अजित यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत प्रेसिडेंट बॉक्समध्ये होते. दरम्यान, सामना पाहताना त्यांनी लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणाची तसेच MCA च्या नव्या मॅनेजिंग कमिटीच्या निवडणुकीबाबतचे सर्व तपशील अत्यंत बारकाईनं जाणून घेतले.
त्यातली बरीच प्रकरण, माहिती, संदर्भ त्यांना तारखेसह अवगत होते हे विशेष... त्यांनी भारतीय संघाची संपूर्ण फलंदाजी पाहिली. तसेच न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीची सुरुवातीची 10 षटके पाहिली..त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले....
पण पवार यांच्या प्रेसिडेन्ट बॉक्समधल्या उपस्थितीमुळे मुंबई क्रिकेटच्या राजकारणात आता चर्चा सुरु झालीय...भले पवार यांना लोढा समितीच्या शिफारसींमुळे राजीनामा द्यावा लागलाय, पण इतक्या मेहनतीने उभारलेले हे मुंबई क्रिकेटचं ऐश्वर्य त्यांना सहजासहजी आपल्या हातातून निसटू द्यायचं नाहीये...यापुढे अध्यक्ष कुणी होईल, पण मुंबई क्रिकेटवर नियंत्रण आपलंच आहे यासाठी पवारांची ती चाचपणी होती...तसेच क्रिकेट आणि क्रिकेटमधल्या राजकारण अजूनही आपला रस तितकाच कायम आहे हा पवारांचा सूचक इशारा BCCI लाही होता...