पवारांची खेळी... एका दगडात मारले अनेक पक्षी, पाहा कुणाकुणाला दाखवला `कात्रजचा घाट`?
Sharad Pawar : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ही राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे... एकाच गुगली बॉलमध्ये शरद पवारांनी भल्याभल्यांची विकेट काढलीय.
Maharashtra Politics : शरद गोविंदराव पवार... देशातले पॉवरफुल पॉलिटिशियन... तेल लावलेला मुरब्बी पैलवान... कात्रजचा घाट दाखवणारा गेमचेंजर... पवारांनी जेवढी विशेषण लावावी, तेवढी कमीच पडतील. कारण आपल्या राजीनाम्याच्या अस्त्रानं त्यांनी पुन्हा एकदा आपणच 'द किंग' असल्याचं सिद्ध केलंय. आपल्या राजीनाम्याच्या घोषणेनं त्यांनी एकाच डावात अनेकांचे मनसुबे उधळून लावलेत. त्यापैकी सर्वात प्रमुख नाव म्हणजे पवारकाकांचे पुतणे अजित पवार.
अजित पवारांना ब्रेक?
अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राजीनाम्याच्या खेळीनं पवारांनी अजित पवारांच्या मनसुब्यांना ब्रेक लावल्याची चर्चा आता रंगलीय. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर एकट्या अजित पवारांनी त्या निर्णयाचं समर्थन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र त्याच अजित पवारांना राजीनामा फेटाळण्याच्या निर्णयाला संमती द्यावी लागली.
मोदी-शाहांना शह?
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी गळ टाकला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) राजकीय डावपेचांना पवारांनी सुरूंग लावल्याचं मानलं जातंय .महाराष्ट्रात भाजपपुढं शरद पवार (Sharad Pawar) नावाचं मोठं आव्हान अजूनही कायम आहे, हेच त्यांनी दाखवून दिल्याची चर्चा आहे.
ठाकरेंवरही 'रिमोट कंट्रोल'?
महाराष्ट्रात सध्या ठाकरे घराण्याचा नाही, तर पवारांचा रिमोट कंट्रोल चालतो, हे पवारांनी दाखवून दिल्याचं बोललं जातंय. पवारांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मातोश्रीवरून सिल्व्हर ओकवर यावं लागतं. आपल्या आत्मचरित्रातही पवारांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले होते.
काँग्रेसवर वचक
सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि ती धुरा मल्लिकार्जुन खरगेंवर सोपवली. मात्र राष्ट्रवादीत आपणच एकमेव पॉवर सेंटर आहोत, हे पवारांनी या घडामोडींमधून दाखवून दिलंय. गांधी ब्रँडपेक्षा पवार हा ब्रँड जास्त खणखणीत असल्याचं यातून समोर येतंय. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवरही यापुढं पवारांचाच वचक असणार, हे आता स्पष्ट झालंय. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना लागलेला ब्रेक हे पवारांचं महत्त्व अधोरेखित करतं...
शरद पवारांनी पवारांनी राजीनामा मागे घेतला असला तरी हे सगळं राजकीय नाट्य म्हणजे पवारांचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जातंय. पवारांच्या राजीनाम्यानं राष्ट्रवादीतली फूटही टळलीय. शरद पवारांचे राजकीय डावपेच भल्याभल्यांना कळत नाहीत. राजीनामा नाट्यामुळं पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब झालंय. एकहाती राजकीय भूकंप घडवण्याची ताकद असलेले पवार एवढे पॉवरफुल का, हेच यातून स्पष्ट होतंय...