दीपक भातुसे, मुंबई :  राज्यात एकीकडे कोरोनाचे वाढते संकट आणि दुसरीकडे राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थिर आहे, असा स्पष्ट संदेश शरद पवार यांनी या भेटीनंतर दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी उद्धव ठाकरे सरकार स्थिर असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी मजबूत उभे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आहेत, असं पवार यांनी सांगितलं.


सरकारबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचे आहे. त्यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्दीष्ट आहे.


भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला लक्ष केलं जात असून राज्यपालांकडे तक्रारी करून सरकार अस्थिर करण्याचे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. त्याआधी शरद पवार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही राजभवनावर जाऊन भेट घेतली होती.


 



कोरोनाची स्थिती हाताळण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावले आहेत. गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत. पवार आणि ठाकरे यांनी आधीच्या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांवर अधिकाऱ्यांसह चर्चा केली होती. कालची बैठक ठाकरे, पवार आणि संजय राऊत यांच्यातच झाल्याचे कळते.