शेअर बाजार आणखी खड्ड्यात! 4.59 लाख कोटींचा फटका बसण्यामागे `ही` आहेत 5 मुख्य कारणं
Share Market Collapse: बुधवारी शेअर बाजार 1628 अंकांनी गडगडल्यानंतरही आजही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या पडझडीमागील कारणं काय आहेत पाहूयात...
Share Market Collapse: बुधवारनंतर गुरुवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली. बुधवारी शेअर बाजार 1628 अंकांनी गडगडला. आज म्हणजेच गुरुवारीही शेअर बाजार पहिल्या सत्रामध्ये 500 अंकांनी गडगडला आहे. निफ्टी 21,450 अंकांपर्यंत खाली घसरला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आजही पडझड दिसून येत आहे. आज सेन्सेक्स पडून 70 हजार 982 वर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी सेन्सेक्स विक्रमी कामगिरी करत होता. अचानक शेअर बाजार का गडगडू लागला आहे? एका दिवसात गुंतवणूकदारांचा 4.59 लाख कोटी कसे बुडले? यामागील कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात...
एचडीएफसी बँकेकडून मोठी निराशा -
बुधवारी झालेल्या पडझडीमध्ये सर्वात मोठा परिणाम करणारा घटक हा एचडीएफसी बँकेचा ठरला. डिसेंबर अखेरीस सरलेल्या तिमाहीमध्ये बँकेचे निकाल अपेक्षेपेक्षा फारच निराशाजनक आले. खास करुन व्याजापोटी उत्पन्नांत माफक वाढ आणि मंदावलेले ठेवींचे प्रमाण याचा फटका शेअर्सला बसला. शेअर्सचे मूल्य घसरले. निफ्टी 50 निर्देशांकांमध्ये 13.52 टक्के असा समभागाचे भारमान असल्याने त्यातील पडझडीचा परिणाम निर्देशांकावर झाला.
दर कपतीच्या विलंबाची चिंता -
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी व्यदार कपात अपेक्षेपेक्षा मंद गतीने होण्याची शक्यता व्यक्त केली. वॉलर यांनी हा इशारा दिल्यानंतर त्याचे प्रतिकूल पडसाद जगभरातील शेअर बाजारांवर झाले आहेत.
अमेरिकी रोखे परताव्यात वाढ -
वॉलर यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेतील 10 वर्ष मुदतीच्या रोख्यांवरील परताव्यावर तीव्र स्वरुपाची वाढ झाली नाही. याशिवाय डॉलर निर्देशांक 4 टक्क्यांनी वधारुन एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
जागतिक स्तरावरील संकेत -
व्याजदर कपातीस संभाव्य विलंबाच्या नकारात्मकतेने जगभरातील भांडवली बाजारा मंदीवाल्यांनी ताबा घेतला. अमेरिकी भांडवली बाजारात डाउजोन्स इंडस्ट्रियल निर्देशांक, एसअँडपी 500 आणि नॅसडॅक 100 मध्येही घसरण दिसून आली. आशियामधील शेअर बाजारांमध्येही पडझडच दिसून आली. हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि चीनमधील बाजारांमध्ये ही पडझड दिसून आली.
सगळीकडेच विक्रीचा कल -
माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांमध्ये नकारात्मक पातळीवर शेअर्स स्थिरावले. डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने धातू कंपन्यांच्या शेअर्सची घसरण झाली. त्यामुळे निफ्टी मेटल निर्देशांक 3 टक्क्यापेक्षा अधिक घसरला. वाहन निर्मिती, औषध निर्मिती, ग्राहकउपयोगी वस्तू, ऊर्जा, सार्वजनिक बँक क्षेत्र निर्देशांता प्रत्येक 1 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.