Share Market News in Marathi: भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज व्यापाराला सुरुवात झाली तेव्हा निर्देशांक निफ्टी (Nifty)आणि सेन्सेक्स (Sensex) आज सर्वोच्च स्तरावर पोहोचल्याचं पहायला मिळालं. प्री-ओपन सेशनमध्ये शेअर बाजार 200 तर निफ्टी 90 अंकांनी वधारल्याचं पहायला मिळालं. मंगळवारी भारतीय कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने सेन्सेक्स 63,400 वर तर निफ्टी 50 अंकांनी वधारुन 18,800 वर बंद झाला. परदेशी गुंतवणुकदारांकडून सलग 3 दिवसांपासून सुरु असलेली शेअर विक्री मंगळवारी मंदावल्याचा फायदाही शेअर बाजाराला झाला. आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा निफ्टी 18900 च्या वर होता. शेअर बाजारामध्ये आलेली तेजी ही परदेशी गुंतवणुकदारांमुळे नसून घरगुती गुंतवणूकदारांमुळे असल्याने हा ट्रेण्ड दिर्घकाळ राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी शेअर बाजारात 2 हजार 24 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची भर पडली. 


...म्हणून बाजारामध्ये तेजीचं वातावरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर 2022 नंतर गेल्या आठवड्यात 18886 पर्यंत जाऊन बाजारात खाली कोसळला होता. आज अखेर निफ्टीनं हा विक्रम मोडत सर्वोच्च पातळी ओलांडली असून 18900 च्या वर उघडला आहे. काल दुपारनंतर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्यातील विलीनीकरणाची तारीख जाहीर झाली. यामुळेच भारतीय गुंतवणुकदारांनी शेअर बाजारावर अधिक विश्वास दाखवल्याचं चित्र पहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाल्याने बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालं आहे.


घरगुती गुंतवणूकदारांचा विश्वास


बाजारातील गुंतवणुकीमध्ये आणि सध्या आलेल्या भरभराटीला घरगुती गुंतवणूकदार कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. भारतीय गुंतवणुकदारांनी मोठ्याप्रमाणात खरेदी केल्याचा फायदा बाजाराला झाला आहे. वाढलेली खरेदी आणि कमी झालेली विक्री याचा दुहेरी परिणाम दिसून येत आहे. घरगुती बाजारपेठेमधील हा ट्रेण्ड दिर्घकाल राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदार या तेजीमुळे आकर्षित झाल्याने बाजाराला अधिक फायदा होईल असं सांगितलं जात आहे.


दोन्ही एचडीएफसीचं विलिनीकरणाला परवानगी


एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी लिमिटेडच्या (HDFC Limited) विलिनीकरणाला शेअर बाजाराने मंजुरी दिली आहे. 1 जुलै 2023 पासून दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाचा निर्णय लागू होणार असल्याची माहिती एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख (HDFC Group Chairman Deepak Parekh) यांनी मंगळवारी दिली. एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसीच्या विलिनीकरणासंदर्भात 30 जूनला मार्केट बंद झाल्यानंतर बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ग्रुपचे उपाध्यक्ष आणि सीईओ केके मिस्त्री यांनी कंपनीचे शेअर डिलिस्टिंग केले जातील अशी घोषणाही केली. 13 जुलैपासून एचडीएफसी स्टॉक डिलिस्टिंग ((HDFC Stock Delisting) होणार आहे. याचा अर्थ 13 जुलैला ग्रुपच्या हाऊसिंग फायनान्स फर्मचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून हटण्याची प्रक्रिया सुरु होईल.


जगातील पाचवी सर्वात मौल्यवान बँक


एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचं विलिनीकरण झाल्यास HDFC बँक ही जगातील पाचवी सर्वात मौल्यवान बँक ठरेल. एप्रिल 2023 पर्यंत एचडीएफसी बँक मार्केट कॅपच्या हिशोबाने म्हणजेच एकूण मूल्याच्या दृष्टीने जागतिक क्रमवारीमध्ये 11 व्या स्थानी होती. 'बिजनेस टुडे'च्या रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनी 30 जूनला मार्केट बंद झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या बोर्डाची बैठक होईल आणि विलिनीकरणावर शिक्कामोर्तब केलं जाईल, असं म्हटलं आहे. एचडीएफसी बँकेने गतवर्षी 4 एप्रिल 2022 पर्यंत एचडीएफसी लिमिटेडचं अधीग्रहण करण्यासाठी सहमती दर्शवलेली. ही तब्बल 40 अब्ज डॉलर्सची डील होती. प्रस्तावित युनिटचं एकत्रित मूल्य सुमारे 18 लाख कोटी रुपये असेल.