बेस्टच्या संपाचं स्क्रिप्ट दुसऱ्याने लिहिलं होतं, शशांक राव केवळ निमित्त- शिवसेना
शिवसेनेने या संपातून माघार घेतल्यानंतरही शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कृती समितीने यशस्वीपणे संप पुढे रेटला होता.
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनी संप माघारी घेतल्यानंतर आता शिवसेना आमदार अनिल परब यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. बेस्टच्या संपाची स्क्रीप्ट दुसऱ्यानेच लिहली होती, शशांक राव हे केवळ निमित्तमात्र होते, असे परब यांनी म्हटले. शिवसेनेने या संपातून माघार घेतल्यानंतरही शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कृती समितीने यशस्वीपणे संप पुढे रेटला होता. यावरून शिवसेनेला बऱ्याच टीकेलाही सामोरे जावे लागले होते. तसेच शशांक राव यांच्या एकट्याच्या नेतृत्त्वाखाली संप यशस्वी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला एकप्रकारे धक्का लागला होता.
'बेस्ट'च्या संपाचा दुसरा दिवस, सेनेची घोषणा फोल
या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अनिल परब यांनी गुरुवारी शशांक राव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेस्टच्या संपाची स्क्रीप्ट दुसऱ्यानेच लिहली होती. न्यायालयाचा आदेश आला नसतानाही शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. बेस्टमधील कनिष्ठ कामगारांसोबत सर्वच कामगारांचा प्रश्न सोडवला जावा, अशी शिवसेनेची इच्छा होती. तसा तोडगाही शिवसेनेने काढला होता. मात्र, शशांक राव यांनी फक्त कनिष्ठ श्रेणी कामगारांचाच प्रश्न लावून धरल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. जर शशांक राव यांना कर्मचाऱ्यांची ग्रेडच बदलायची होती, तर त्यांनी तसा प्रयत्न करायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी सगळ्याचा खेळखंडोबा केला. या सगळ्याचे स्क्रीप्ट दुसऱ्या कुणीतरीच लिहले होते. शशांक राव यांनी आमच्या पाठिशी अदृश्य हात असल्याचे म्हटले होते. कामगार हिताचा विचार न करता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचा आरोप परब यांनी केला. बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार सात हजार रुपयांनी वाढवून घेतल्याचा कामगार नेते शशांक राव यांचा दावा खोटा आहे. राव यांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगाराची पे स्लिप आणून दाखवावी, असे आव्हानही परब यांनी दिले.