Raj Kundra Connection With Bangladeshi Adult Film Actor Riya Arvinda Barde: ठाण्यामधील उल्हासनगरमधून बांगलादेशी अडल्ट अभिनेत्री रिया अरविंद बेर्डेला मागील आठवड्यामध्ये अटक करण्यात आली. भारतामध्ये बेकायदेशीरपणे खोटी कागदपत्रं वापरुन राहत असल्याचा ठपका रिया बेर्डे आणि तिच्या कुटुंबावर ठेवण्यात आल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. काही बातम्यांमध्ये रिया बेर्डेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रोडक्शनसाठी काम केल्याचा दावा तिच्या अटकेनंतर केला होता.


काय म्हटलंय राज कुंद्रेने?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता राज कुंद्राने 'हिंदुस्तान टाइम्स सिटी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आपला रिया अरविंद बेर्डेशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. आपला आणि रिया अरविंद बेर्डेचा संबंध असल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. या दाव्यांमुळे आपण व्यथित झालो आहोत असंही राज कुंद्राने म्हटलं आहे. "नुकत्याच काही बातम्या वाचून मी व्यथित झालो आहे. या बातम्यांमध्ये माझ्याबद्दलचे खोटे दावे करण्यात आले आहे. या बातम्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने भारतात राहत असल्या प्रकरणी अटक करण्यात आलेली एक व्यक्ती माझ्या एका प्रोडक्शन कंपनीसाठी काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, मी या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही. मी कधीही या व्यक्तीबरोबर माझ्या कोणत्याही प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून काम केलेलं नाही," असं राज कुंद्राने म्हटलंय.


"हे आरोप खपवून घेणार नाही"


या प्रकरणी करण्यात आलेले दावे बिनबुडाचे आहेत, असंही राज कुंद्राने म्हटलं आहे. या अशा दाव्यांमुळे माझी प्रतिष्ठा धुळीस मिळत असल्याचंही कुंद्राने म्हटलंय. "या बिनबुडाच्या दाव्यांमुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसण्याबरोबरच माझं नाव सेन्सेशनॅलिझमसाठी आणि प्रसारमाध्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं जात आहे. मी माझा उद्योग व्यवसाय प्रामाणिकपणे केला असून मी असे खोटे आरोप खपवून घेणार नाही," असंही कुंद्राने म्हटलं आहे. 


कायदेशीर कारवाई करणार?


या प्रकरणी आपण कायदेशीर कारवाईचा विचार करत असल्याचं राज कुंद्राने स्पष्ट केलं आहे. राजचे वकील प्रशांत पाटील यांनी, "सोशल मीडियावर, डिजीटल तसेच छापील प्रसारमाध्यमांमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या बेकायदेशीर नागरिकांच्या प्रकरणामध्ये काही दावे करण्यात आलेत. या खोट्या बातम्यांमध्ये सदर प्रकरणातील आरोपीचं शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रांच्या प्रोडक्शन हाऊसबरोबर संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे. मुद्दाम माझ्या क्लायंटला बदनाम करण्यासाठी हे केलं जात आहे. या प्रकरणाशी माझ्या क्लायंटचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नसताना त्याचं नाव यात गोवलं जात आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारचा चुकीचा आणि खोटा कंटेट वापरला जात असून या प्रकरणी माझे क्लायंट गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडे तातडीने करणार असून ही तक्रार माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत केली जाईल," असं म्हटलं आहे.