Maharashtra Political Crisis : दोघांमध्ये तिसरा आला... शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadanvis Government) राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले.. मात्र यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) गटात अस्वस्थता पसरलीय. शपथविधी सोहळ्यात फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवारांमध्ये हास्यविनोद सुरू होते, तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणखीच गंभीर झालेला दिसला. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळं मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेतले (Shivsena) मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झालीय. अजित पवार निधी देत नाहीत, मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीची दादागिरी वाढलीय, अशी कारणं शिंदे गटाच्या आमदारांनी बंडाच्या वेळी दिली होती.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेतील आमदार नाराज
मात्र आता त्याच अजित पवारांसोबतच सत्तेत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ शिंदे गटावर आलीय. राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळं शिवसेनेतल्या मंत्रीपदासाठी इच्छुकांची भलतीच कोंडी झालीय. राष्ट्रवादीला मंत्रीपदं द्यावी लागल्यानं सत्तेतला शिंदे गटाचा वाटा कमी झालाय. महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासारख्यांची दुहेरी पंचाईत झालीय. त्यांना मंत्रीपद तर मिळालं नाहीच, उलट राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्यानं त्यांचा हिरमोड झालाय. नाशिकमध्ये भुजबळांच्या राजकारणाला कंटाळून आमदार सुहास कांदे शिंदेंसोबत आले. आता भुजबळ मंत्री झाल्यानं कांदेंची डोकेदुखी वाढलीय. शिंदे गटातील बहुसंख्य आमदार गेल्यावेळी राष्ट्रवादीला हरवून विजयी झाले होते. आता भविष्यात तिकीट वाटपात राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. 


भाजपाला शिंदे गटाचा सूचक इशारा
अजित पवारांना सत्तेत सामावून घेऊन भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे. मध्यंतरी काही मंत्र्यांना वगळण्याची सूचना भाजपकडून करण्यात आली होती. त्यावेळी जनतेची पसंती शिंदेंनाच असल्याची जाहीरात प्रकाशित करून शिंदे गटानं दबावाचं राजकारण सुरू केलं. शिंदेंचं महत्व कमी करण्यासाठी तसंच लोकसभा निवडणुकीतली राजकीय समीकरणं लक्षात घेऊन भाजप चाणक्यांनी अजित पवारांना सोबत घेतल्याचं सांगितलं जातंय.. शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार अजूनही लटकते आहे. अशा परिस्थितीत सरकार धोक्यात येऊ नये, याचीही काळजी भाजप नेतृत्वानं घेतलीय...


शिंदेंची तातडीची पत्रकार परिषद
त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. साहेबांच्या आशिर्वादाने मी काम करतोय, साहेबांच्या आदर्श मार्गावर चालतोय, असं सांगत गेल्या वर्षभरात लोकहिताचे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. तसंच कुठलाही वैयक्तिक निर्णय घेतला नाही. शेतकरी कष्ठकरी गोरगरीब विद्यार्थी या राज्यातील सर्व घटकांना न्याय देणारे निर्णय घेतले.  प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचा निर्णय घेतलाय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.