सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई  : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन 100 दिवस उलटून गेलेत. सत्तांतराच्या वेळी शिवसेनेचे (Shiv Sena) तब्बल 40 आमदार शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले. बंडाचं निशाण फडकावणाऱ्या या आमदारांच्या (MLA) जीवाला धोका असल्यानं सुमारे 31 आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा (Y Level Security) देण्यात आली. मात्र त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनतेच्या पैशांवर आमदारांची सुरक्षा? 
Y दर्जाच्या सुरक्षेमध्ये 11 सुरक्षारक्षक तैनात असतात. यात 2 कमांडोज, 2 पीएसओंचा समावेश असतो. शिवाय एस्कॉर्ट म्हणजे पायलट वाहनात 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 कर्मचारी असतात. म्हणजेच दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी 22 पोलीस अधिकाऱ्यांची ड्युटी लागते. एका आमदाराच्या सुरक्षेचा महिन्याचा सरासरी खर्च 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. 31 आमदारांवर सुरक्षेसाठी जनतेच्या पैशांतून करोडोंचा खर्च होतोय. त्यामुळं ही सुरक्षा काढून घेण्याची मागणी विरोधकांनी केलीय.


दरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांना सातत्यानं धमक्या येत असल्यानं सुरक्षा दिल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय. एखाद्या राज्यमंत्र्याला दिली जाणारी सुरक्षाव्यवस्था शिंदे गटाच्या आमदारांसाठी तैनात करण्यात आलीय. यामुळं जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा तर होतच आहे. शिवाय पोलिसांवरचा कामाचा ताणही वाढतोय.