मुंबई : सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे १० रुपयांत शिवभोजन थाळी. संपूर्ण राज्यात दिमाखात या योजनेचं उदघाटन झालं. मात्र दुसऱ्याच दिवशी याचं वास्तव समोर आलं. दुपारी १२ ते २ वेळ दिलेली असतानाही अर्ध्या तासात थाळी संपली असं जाहीर करण्यात आलं. अखेर दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम अशीच गत या योजनेची झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० रुपयांत शिवभोजन थाळीची राज्यात १२५ ठिकाणी, तर मुंबईत ४ ठिकाणी सुरुवात झाली. ७० ते १५० थाळ्या त्या त्या प्रभागात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू झाली. नायर रुगणलाय, सायन रुग्णालय, केईएम आणि धारावी येथे ही सेवा सुरू झाली. मात्र आज नायर रुग्णालयात दुपारी बारा वाजताच थाळी संपली असं कँटीन चालकाने सांगितलं. १०० थाळ्यांचीच सोय असताना नागरिकांकडून मात्र दुप्पट प्रतिसाद मिळाला.


अगदीच लिमिटेड थाळी उपलब्ध असल्याने कितीतरी नागरिकांचा यामुळे हिरमोड झाला. दुपारी १ नंतर आलेल्या ग्राहकांना थाळी मिळालीच नाही. १० रुपयांची थाळी मिळेल, स्वस्तात जेवण होईल या आशेने लोक आले मात्र त्यांना थाळी संपली असा बोर्ड बघायला मिळाला. सरकारने थाळीची संख्या वाढवावी अशीच मागणी नागरिकांनी केली. 


सरकारने सुरू केलेल्या या योजनेत या उणीवा आढळून आल्या आहेत. शिवभोजन थाळीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा हिरमोड झाल्यानं सरकारचं कौतुक करावं का टीका अशीच परिस्थिती आहे. थाळीची संख्या वाढवल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल असंच दिसतं आहे.