काश्मीरमध्ये शिवसैनिकांनीच फडकवला तिरंगा : संजय राऊत
`काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात सरकार कमी पडले`
मुंबई : अयोध्येतल्या आंदोलनाचा परमोच्च बिंदू जसा शिवसैनिकांनी गाठला तसाच श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवून काश्मीर हा हिंदुस्तानाचाच भाग आहे, हे आमच्या शिवसैनिकांनी दाखवून दिले, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी 'त्या' शिवसैनिकांचे केले अभिनंदन
लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हान काश्मीरी नेते अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. हे आव्हान सरकारला होते. सरकारने ते पेलने गरजेचे होते. मात्र, सरकार त्यात कमी पडले, अशी टीकाही राऊत यांनी या वेळी केली. दरम्यान, काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या 'त्या' शिवसैनिकांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली.
राहुल गांधींना नेता बनविण्यात सध्याच्या सरकारचा मोठा वाटा
राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होत आहेत. त्यांना अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा. राहुल गांधी यांना नेता बनवण्यात सध्याच्या सरकारचा खूप मोठा वाटा आहे. जसे नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यामध्ये राहुल गांधी यांचा मोठा वाटा आहे, असं चेष्टेने म्हटलं जायचं तसंच, राहुल गांधींना नेतृत्व देण्यात विद्यमान सरकारच्या ध्येय धोरणांचे महत्वाचे योगदांन आहे, असे सांगतानाच गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांचे वेगळे रूप पाहायला मिळत आहे. लोक त्यांना ऐकत आहेत, असेही राऊत यांनी सांगीतले.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी राहुल गांधींनी आयोध्येत जावे
दरम्यान, राहुल गांधी यांच्या सूचक मंदिर भेटीबाबात बोलताना संजय राऊत म्हणाले, गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं राहुल गांधी देवदर्शन करीत आहेत. ते सोमनाथ मंदिरात गेले होते. अनेक मंदिरात जात आहेत. ते मवाळ हिंदुत्वाचा स्वीकार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आमचं त्यांना आवाहन की त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारण्याआधी एकदा अयोध्येत जाऊन श्रीराम यांचे दर्शन घ्यावे, असेही राऊत म्हणाले.