Maharashtra Politcal Crisis : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. पण शिवसेना आमदारांच्या बंडामुळे सामान्य शिवसैनिक (Shivsainik) मात्र चांगलाच संतापला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाला आहे. आमदार सदा सरवणसर, दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली तसंच त्यांचे बॅनरही फाडले. 


पुण्यात महाआरतीचं आयोजन
दुसरीकडे उद्धव ठाकरेंवरचं हे संकट टळण्यासाठी महाआरती आणि भक्ती प्रदर्शनही केलं जात आहे. पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून महाआरती करण्यात आली. मातोश्री वरील विठ्ठलाच्या विरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्रचा प्रतिकार करण्याची शक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्राप्त व्हावी यासाठी येरवड्यातील राम मंदिरात महा आरती करण्यात आली. पक्षातून कुणीही आणि कितीही जन बाहेर पडले तरी आमच्या निष्ठा शिवसेनेशी आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत हे दर्शवण्यासाठी शिवसैनिक एकत्र आले होते.


धुळ्यात भक्ती प्रदर्शन रॅली
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी धुळे शहरात शिवसैनिकांनी भक्ती प्रदर्शन रॅली काढली. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तर महात्मा गांधी पुतळा पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला. 


यावेळी आपण सर्व एक दिलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला. बंडखोर आमदारांविरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. शिवसेनेसाठी अशी बंड नवी नाहीत, त्यामुळे या बंडातुन ही शिवसेना उभारी घेईल आणि गद्दारांना धडा शिकवेल असा विश्वास शिवसैनिकांनी या दरम्यान व्यक्त केला


शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहलं पत्र
'खून दिया है जान भी देंगे, उद्धव साहब तुम्हारे लिये'  असं पत्र एका शिवसैनिकाने आपल्या रक्ताने लिहिलं आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहित आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही लढत रहा असा संदेश दिला आहे.  तसंच एकनाथ शिंदे यांना देखील रक्ताने पत्र लिहत त्यांना देखील बंडखोरी आमदारांना घेऊन महाराष्ट्रात परत याव असं आवाहन या पत्रात केलं आहे.