शिवसैनिकांनी राणांच्या घरावर दगडफेक केली? CCTV फुटेज आलं समोर
राणा दाम्पत्याच्या अमरावतीतल्या घराबाहेर शेकडो शिवसैनिक जमले होते, त्याचवेळी...
अमरावती : राज्यात शिवसेना (ShivSena) विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला होता. त्यानंतर मातोश्रीबाहेर (Matoshree) शेकडो शिवसैनिक (Shiv Sainik) जमा झाले तर तिकडे राणा दाम्पत्याच्या अमरावतीच्या (Amaravati) घराबाहेरही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती.
आता राणांच्या अमरावतीच्या घरावर दगड भिरकावतानाचं CCTV फुटेज समोर आलं आहे. आमदार रवी राणा यांच्या घरावर शिवसैनिक दगड मारतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर शनिवारी संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केलं.
या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. शिवसेनेच्या या आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. यामध्ये शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख प्रवीण हरमकर राणांच्या घराच्या दिशेने दगड फिरकावताना दिसत आहेत.
आंदोलनाप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता दगडफेक झाल्याचं व्हिडिओतून स्पष्ट झाल्याने पोलीस कार्यकर्त्यांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.