मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. ७० उमेदवारांच्या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांना स्थान मिळाले आहे. याशिवाय, शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या प्रदीप शर्मा यांनाही नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपप्रमाणे शिवसेनेनेही आयारामांना संधी दिली आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, विठ्ठल लोकरे, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, निर्मला गावित, प्रदीप शर्मा, सुरेश गोरे, संग्राम कुपेकर, पांडुरंग बरोरा, गौतम चाबुकस्वार यांचा समावेश आहे. 


मात्र, यामध्ये वादग्रस्त जागांचा समावेश नाही. वांद्रे पूर्व आणि वडाळ्यातून कोणाला उमेदवारी द्यायची, यावरून सध्या वाद सुरु आहे. यापैकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा आहे. तर वडाळ्यातील जागेवर भाजपने कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव आग्रही होत्या. यासाठी सोमवारी त्यांनी मातोश्रीवर जाऊन स्वत:ची बाजूही मांडली होती. मात्र, शिवसेना नेतृत्त्वाकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते. 



शिवसेना आणि भाजपकडून सोमवारी संयुक्त परिपत्रक काढून युतीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आज सकाळीच भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता शिवसेनेने ७० उमेदवारांची यादी जाहीर केली. दोन्ही पक्षांनी जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागा लढवणार आहे.