काश्मीर प्रश्न लष्करी कारवाईनेच सुटेल; शिवसेनेचा केंद्र सरकारला पाठिंबा
काश्मीर मुद्द्यावर शिवसेनेचा केंद्राला पाठिंबा
मुंबई : #Kashmir काश्मीर खोऱ्यातील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रणित सरकारच्या भूमिकेचं समर्थन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातील अग्रलेखातून हे विचार मांडण्यात आले आहेत. ज्यामध्ये काही महत्त्वाचे आणि तितकेच कठोर निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकांना दुजोरा देण्यात आला आहे.
अमरनाथ धाम यात्रा स्थगित करण्यात येण्यामागे असणारे संभाव्य उद्देश अधोरेखिक तर अमित शाह यांच्या श्रीनगर दौऱ्यावर अग्रलेखातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये एखादा गृहमंत्री ज्यावेळी या भागात दोऱ्यासाठी येतो तेव्हा त्याचं फुटिरतावादी आणि अतिरेक्यांकडून अक्षरश: बंदुकांनीच स्वागत करण्यात येतं, असं म्हणत अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी मात्र चित्र कासं वेगळं होतं, असं म्हटलं गेलं.
शाह यांच्या येण्याने हेच फुटिरतावादी नेते कुठल्या एका कोपऱ्यात दडून बसले, असं म्हणत एक प्रकारे हे यशस्वी पाऊल असल्याची भूमिका सामनातून मांडली आहे. नोटाबंदीप्रमाणे काश्मीर मुद्द्याविषयी पाळली जाणारी गोपनीयताही या अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आली.
काश्मीर मुद्दा निकाली काढायचा असल्याच सैन्यदलाची कारवाई महत्त्वाची आहे, ज्याची आता वेळही आलीच आहे असं म्हणत मोदी सरकारच्या या संपूर्ण भूमिकेचं शिवसेनेने स्पष्ट समर्थन केलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांना दहशतवादी म्हणून घोषित करत त्यांनाही अटक करण्यात यावी, असं न केल्यास काश्मीरात अराजकता पसरवण्यास मेहबुबा मुफ्तींचे मनसुबे यशव्सी ठरतील असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.