मुंबई :  शिवसेना भवनात सर्व प्रमुख पदाधिकारी, खासदार, लोकप्रतिनिधींना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. याबैठकीनंतर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ जिल्ह्यांमध्ये आम्ही फिरणार असून शिवसेनेविषयी जे गैरसमज  भाजपकडून  पसरवले जात आहेत, आमच्याविषयी त्यांचं जे विष, जळफळाट बाहेर पडतोय आमच्याविषयी त्याला उत्तर देऊ असं राऊत यांनी म्हटलं आहे. 


शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी होती आणि राहील, शिवसेनेच्या हिंदुत्वावादात कोणतीही भेसळ नाही. जे आम्हाला जनाबसेना म्हणतायत, त्यांनी त्यांचा इतिहास, त्यांची कर्तबगारी  तपासून पाहावी असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.


काश्मिर संदर्भात आज जे आम्हाला अक्कल शिकवताय, त्यांनी काश्मिरमध्ये अतिरेक्यांशी हात मिळवणी करुन सरकार स्थापन केलं.  मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केलं, आम्ही तेव्हाही ओरडत होतो हे पाकिस्तानवादी आहेत, हे फुटीतावादी आहेत, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करुन या देशातील हुतात्म्यांचा, काश्मिर पंडितांच्य बलिदानाचा  असा अपमान करु नका हे सांगणारे आम्ही आहोत. 


त्यामुळे जनाबसेना कोण हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार आहोत, आता जे काय प्रकार सुरु आहेत, एमआयएमची महाविकास आघाडीला युतीची ऑफर, हे सर्व भारतीय जनता पक्षाचे डावपेच आहेत. हे भाजपचं कारस्थान आहे, एमआयएम आणि भाजपची आतुन हातमिळवणी आहे, हे छुपे रुस्तम आहेत, त्यांना भाजपने आदेश दिला आहे की, शिवसेनेची बदनामी करा, शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्निचिन्ह निर्माण करा, त्यानुसार एमआयएमचे महाराष्ट्रातले नेते ऑफर करतायत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 


शिवसेना कधीही एमआयएमबरोबर जाणार नाही, जे औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होतात, अशा कोणत्याही पक्षासोबत शिवसेनेचा संबंध कधी राहणार नाही, असं स्पष्ट करत संजय राऊत यांनी एमआयएमकडून आलेली ऑफर ही भाजपच्या कटाचा भाग असल्याचं म्हटलं आहे, शिवसेना अंगार आहे हे भंगारांना दाखवून देऊ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.