मुंबई : शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार आहे. तर विधानसभेत समसमान जागांवर एकमत झाले आहे. 144 - 144 जागा दोन्ही पक्षांकडून लढविण्यात येणार आहे. त्यामुळे दोघांना समान संधी आहे. यावरुन मुख्यमंत्री पद अडीच वर्षे असे राहणार का? याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण केले. विधानसभेत युतीमध्ये ज्याचा एक आमदार जास्त, त्याचा मुख्यमंत्री असणार आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटप असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे पाटील म्हणालेत.


निवडणूक आलेल्या आमदारांच्या संख्येवरून सत्ता स्थापन करतांना मंत्रिपद वाटपाचे सूत्र असेल असणार आहे. दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर मात्र थेट भाष्य करण्याचे टाळले. तर पालघरवरून लोकसभा जागेवरुन युतीमध्ये घमासान सुरू आहे. सेनेने मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यावर त्यांनी भाष्य केले की, लोकसभेसाठी शिवसेनेला एक जादा जागा सोडली आहे, कोणती जागा हे अजून ठरायचे आहे, असे ते म्हणालेत.  



जालन्यातून प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शिवसेना मंत्र्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे येथील जागेबाबत काय धोरण भाजपचे असेल. त्यांना विरोध होत आहे. यावर पाटील यांनी म्हणटेल, दानवे हे कधीही निवडणूक हरलेले नाहीत. नेहमी निवडणूक जिंकतात, ते आताही जिंकतील. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा अडथळा येणार नाही, समजूत घालू, असेही चंद्रकांत पाटील म्हणालेत.


नारायण राणे यांनी कितीही संताप व्यक्त केला असला तरी त्यांची समजूत घालू. तसेच एकनाथ खडसे नाराज नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर तेच ज्येष्ठ आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत. मुख्यमंत्री यांचा दिवसभर दौरा आहे. त्यानियोजनामुळे ते काल आले नाहीत. खडसे आता राज्यातले भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, असे पाटील म्हणालेत.


सोशल मीडियावर टीका होत असली तरी यापेक्षा सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया या युतीच्या बाजूने आहेत. त्यामुळे राज्यात युती होणे एक चांगलीबाब आहे. त्यामुळे कोण काय बोलते यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय वाटते हे महत्वाचे आहे, असे पाटील म्हणालेत.