मुंबई : शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. स्वबळाच्या शक्यतेमुळे दोन्ही पक्षांमधील इच्छुकांनी  गेल्या काही वर्षांपासून जोरदार तयारी केली होती. युती झाल्याने या इच्छुकांची समजूत काढण्यासाठी दोन्ही पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही पक्षांची अधिक ताकद असलेल्या मुंबई आणि परिसरात हे दुखणे अधिक आहे. तसेच स्वतंत्र निवडणुकीची तयारी केलेल्या सर्वांचीच युतीमुळे मोठी अडचण झाली आहे. मागिलवेळी ज्याच्याविरोधात लढत दिली, त्याच्यासाठी काम करण्याची वेळ या सर्वांवर येणार आहे. त्यामुळे नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर युती केली असली तरी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना ती कितपत पटते आहे, ते पाहावे लागणार आहे.


कोणा कोणाची समजूत काढणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीची घोषणा झाल्यानंतर आता लोकसभा निवडणुकांना सामोरे जात असताना मुंबईत दोन्ही पक्षांसाठी सर्वात मोठं अवघड जागेचं दुखणे आहे ते म्हणजे भाजपचे खासदार किरिट सोमय्या. युती झाली तरी ईशान्य मुंबईत किरिट सोमय्यांचे काम करणार नसल्याचे तिथल्या शिवसैनिकांनी बोलून दाखवले आहे. मधल्या काळात किरिट सोमय्यांकडून थेट सेना नेतृत्वावर झालेली टीका शिवसैनिक विसरले नाहीत. त्यामुळंच इथं किरिट सोमय्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिकांना कसं जुंपायचे, हा प्रश्न दोन्ही पक्षांना पडला आहे. तसंच दक्षिण मध्य मुंबईमधून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लढण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे शिवसेनेचे राहूल शेवाळे खासदार असल्याने सेना ती जागा सोडणार नाही. त्यामुळे रामदास आठवलेंची समजूत दोन्ही पक्षांना काढावी लागणार आहे.


यांनी निवडणुकीची केली होती तयारी?


मागील विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळं ब-याच ठिकाणी दोन्ही पक्षांत थेट लढती झाल्या आहेत. गोरेगावमधून शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासाठी आग्रही असेल, परंतु तेथून निवडून आलेल्या भाजपच्या राज्यमंत्री विद्या ठाकूर या दावा सोडणार नाहीत. इथेही प्रश्न कायम आहेच शिवाय सायनमधून मंगेश सातमकर, कुलाब्यातून पांडूरंग सकपाळ, दहिसरमधून विनोद घोसाळकर या महत्वाच्या शिवसेना उमेदवारांसह अनेकजण दुस-या क्रमांकावर होते, ज्यांनी आता स्वबळाच्या शक्यतेने तयारीही सुरु केली होती. तर भाजपमध्येही मागाठाणेतून प्रविण दरेकर, वांद्रे पूर्वमधून महेश पारकर, दिंडोशीतून मोहित भारतीय यासह अनेकांनी तयारी सुरू केलीय. अशी तयारी केलेल्या सर्वांचीच युतीमुळे मोठी अडचण झाली आहे. मागिलवेळी ज्याच्याविरोधात लढत दिली, त्याच्यासाठी काम करण्याची वेळ या सर्वांवर येणार आहे. त्यामुळे नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर युती केली असली तरी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना ती कितपत पटते आहे, ते पाहावे लागणार आहे.