मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहण्याची कोणतीही गरजच नाही. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. ते सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 
   
   मराठा आरक्षणासंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी मातोश्रीवर पाचारण केले होते. यावेळी उद्धव यांनी आमदारांशी चर्चा करुन त्यांचे मत जाणून घेतले. यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.
   
  मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, असे उद्धव यांनी सांगितले. या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही उद्धव यांनी सांगितले. 
  
 माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.