मुंबई : राहुल गांधी मंदिरात गेले याचे स्वागत करायला हवे होते. राहुलचे मंदिरात जाणे हा एकप्रकारे हिंदुत्ववादाचा विजय आहे व बेगडी निधर्मवादापासून राहुल गांधी काँग्रेसला मवाळ हिंदुत्ववादाकडे नेत असतील तर संघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करायला हवा, असा खोचक सल्ला देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना दिला आहे.


राहुल गांधींवर स्तुतीसुमने, मोदींवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला सत्तासहकारी आणि मित्रपक्ष भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. सध्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीवरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींव निशाणा साधला आहे. गुजरात निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारात होत असलेली दमछाक. तसेच, राहुल गांधींचे कमालीचे आक्रमक होणे आणि भाजपला आव्हान उभा करणे या विषयावर उद्धव ठाकरे यांनी दै. सामनामध्ये एक लेख लिहीला आहे. या लेखात ठाकरे यांनी राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.


राहुलचे मंदिरात जाणे हा  हिंदुत्ववादाचा विजय


दै. सामनातील लेखात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींचे कौतूक केले आहे तर, मोदींवर टीका केली आहे. ठाकरेंनी म्हटले आहे की, राहुल गांधींची निवड ही घराणेशाही असल्याची टीका भाजपने सुरू केली आहे. राहुल गांधी हे मंदिरात गेले व पूजा केली याचाही भाजपास संताप आला आहे. उलट राहुल गांधी मंदिरात गेले याचे स्वागत करायला हवे होते. राहुलचे मंदिरात जाणे हा एकप्रकारे हिंदुत्ववादाचा विजय आहे व बेगडी निधर्मवादापासून राहुल गांधी काँग्रेसला मवाळ हिंदुत्ववादाकडे नेत असतील तर संघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करायला हवा.


मोदी राहुल गांधींना स्पर्धक मानतात....


मात्र राहुलची ताजपोशी म्हणजे औरंगजेबाची राजवट असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. याचा अर्थ असा की, मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात औरंगजेबाच्या राजवटीविषयी भयंकर तिटकारा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावेत व महाराष्ट्रातील औरंगजेब, अफझल खानाच्या कबरी खणून उद्ध्वस्त कराव्यात, असेही ठाकरे यांनी सामनातील लेखात म्हटले आहे.