शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे. सत्तासंघर्ष म्हटले की आमदारांची फोडाफोडी आली येते. तसे अनेकवेळा दिसून आले आहे. भाजपकडून असा प्रकार झालाच, तर फुटीर आमदारांची खैर नाही, असा सज्जड दम राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत दिला आहे. आज आला आहे. कोण माईचा लाल पुन्हा निवडून येतो, असे म्हटले आहे.
भाजपने आपल्याकडे संख्याबळ नसल्याने आपण सत्ता स्थापन करणार नाही म्हटले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला विचारणा केली. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची पत्रे सादर करता आली नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रवादीने मुदत वाढीची मागणी केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्यात. आमचा सत्ता स्थापनेचा दावा कायम आहे, असे शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले. राष्ट्रवादीकडूनही सत्ता स्थापनेची जुळवाजुळव सुरु आहे. त्यानंतर भाजपकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.
भाजपची १४५ ची जुळवाजुळव सुरू आहे. सत्तास्थापनेसाठीची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपवली आहे, असे वक्तव्य भाजप नेते नारायणे राणे यांनी केले. त्यामुळे भाजपही सत्ता स्थापन करणार याची चर्चा सुरु झाली. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. आमचा कोणताही आमदार फुटणार नाही. जर फुलटलाच तर त्याची खैर नाही, असे म्हटले.
दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचे हा प्रश्नच आहे. सध्याच्या काळात कोणताही आमदार फुटणार नाही, जर आमदार फुटलाच तर तीन पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता मायकालाल हरवू शकत नाही, अशी परखड प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. सध्याच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर कोणी फुटलाच तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार त्याच्या विरोधात उभा राहील आणि इतर दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांच्या आज तातडीच्या बैठकी झाल्यात. त्यात सरकार स्थापन करण्याबाबत विचारविनिमय झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, सरकार स्थापन होईल, असा विश्वास आमदारांना दिला आहे.