Thackeray Group vs Shinde Group : दसरा मेळावा ही शिवसेनेची (Shivsena) परंपरा. मात्र या परंपरेला आता आखाड्याचं स्वरूप आलंय. शिवसेनेत उभी फूट पडलीय. शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shinde Group) एकमेकांसमोर उभे ठाकलेत. ठाकरे गटाचा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा मुंबई महापालिकेसमोरील आझाद मैदानात होणाराय. या मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये राजकीय आखाडा रंगलाय. दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना ठाकरे गटानं आपल्या टिझरमधून गद्दारी आणि खोक्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलाय. काहीजण पळून जाणारे असतात. शत्रूशी हात मिळवणारे असतात. रात्रीच्या अंधारात गद्दारी करून घर फोडणारे असतात. पण मर्द विकला जात नाही. मर्द गद्दारी करत नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडं शिंदे गटानं आपल्या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्याच पोझमध्ये एकनाथ शिंदे दाखवलेत. ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना... असा दावा करत शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व असा नारा शिंदे गटानं दिलाय..


उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परंपरा यंदाही कायम राखलीय. शिवाजी पार्कसाठी सुरूवातीला दोन्ही गटांनी दावा केला.  मात्र शिंदे गटानं नंतर माघार घेतल्यानं ठाकरेंचा मार्ग मोकळा झाला..


दसरा मेळाव्याचा आखाडा 
मराठा आरक्षण, भ्रष्टाचार, दुष्काळ, बेरोजगारी अशा मुद्यांवरून उद्धव ठाकरे आपल्या भाषणात शिंदे सरकारवर तोफ डागतील, अशी अपेक्षा आहे. विरोधी नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआयचा होणारा गैरवापर, आमदार अपात्रता सुनावणीतली दिरंगाई यावरूनही ते टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे. तर मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारनं घातलेला घोळ, इंडिया आघाडीत सहभागी होताना हिंदुत्वाला ठाकरेंनी दिलेली तिलांजली, राज्य आणि केंद्र सरकारची दमदार कामगिरी, दुष्काळी उपाययोजना यावरून मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात ठाकरेंवर पलटवार करण्याची शक्यता आहे.


दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राजकीय शक्तिप्रदर्शनाची संधी शिवसेनेच्या दोन्ही गटांना आहे. आणि त्या संधीचं सोनं लुटण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसलीय. मेळाव्याला जमणाऱ्या शिवसैनिकांच्या लाखालाखांच्या गर्दीला ठाकरे आणि शिंदे काय नवा विचार देतात, याची उत्सूकता सगळ्यांना आहे.