शिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसेची याचिका
भाजपला दे धक्का देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेने आपल्या गळाला लावले. मात्र, मनसेने कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केलेय. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी झाल्याशिवाय मनसे नगरसेवकांना शिवसेनेत दाखल करून घेणे शक्य होणार नाही.
मुंबई : महापालिकेत भाजपला दे धक्का देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेने आपल्या गळाला लावले. मात्र, शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसेने कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केलेय. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी झाल्याशिवाय मनसे नगरसेवकांना शिवसेनेत दाखल करून घेणे शक्य होणार नाही.
मनसेच्या ६ नगरसेवकांचे शिवसेना विलीनीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलेय. तर दुसरीकडे या सहा नगरसेवकांना फोडण्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केलेय. त्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता आहे.
मनसेतील सहा नगरसेवकांचे शिवसेनेत पक्षांतर घडवून आणताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेय. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभाग चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना शिवबंधन धागा बांधला असला तरी, तांत्रिकदृष्ट्या ते अजून मनसेतच आहेत. त्यामुळे या सहाही नगरसेवकांना मनसेचा आदेश मानावा लागणार आहे.
मनसेने या सहा नगरसेवकांचे पद रद्दबातल करावे, अशी याचिका कोकण आयुक्तांकडे याअगोदर दाखल केली होती. आता दुसर्यांना फुटीर नगरसेवकांना नगरसेवक फंड देण्यात येऊ नये, एवढेच नाही तर त्यांना पालिका सभागृहासह विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून बसण्यास परवानगी देऊ नये, अशी याचिकाही दाखल करण्यात आलेय, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलेय. दोन तृतीयांश आमदार फुटले तर त्यांना स्वतंत्र गट स्थापन करणे अथवा विलीनीकरण करता येते. स्थानिक स्वराज्य संस्थेला हा कायदा लागू पडत नाही. त्यामुळे या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्दबातल झालेच पाहिजे, असेही देशपांडे यांनी सांगितले
दरम्यान, शिवसेनेने मनसे नगरसेवकांच्या विलीनीकरणाच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यात. त्यामुळे त्यांचा प्रवेश कोणीच रोखू शकणार नाही. कोकण आयुक्तांकडून पत्र आल्यानंतर पालिका सभागृहात सहाही नगरसेवकांच्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सभागृह नेते जाधव यांनी स्पष्ट केले.