मुंबई : काही दिवसांपूर्वी एआयएमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे. यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं. यानंतर संभाजीनगरच्या नामांतरावरुनही चांगलाच वाद पेटलेला पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर नामांतराच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला. दरम्यान आता औरंगाबादचं नावं संभाजीनगर करण्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (shiv sena former mp and leader chandrakant khaire on renaming of aurangabad to sambhajinagar) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडून 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करणार अशी घोषणा करण्यात आली. मात्र ही अद्याप घोषणाच राहिली. मात्र 8 जूनला औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर होऊ शकतं, असे संकेत मिळतायेत.


"कोणत्याही क्षणी औरंगाबाद शहराचं नाव हे संभाजीनगर होऊ शकतं. यासाठीच्या सर्व कायदेशीर बाबी तयार आहेत", असा दावा शिवेसनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकात खैरे यांनी केला आहे.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? 


देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बीकेसीत झालेल्या सभेवर सडकून टीका केली. फडणवीस यांनी या सभेदरम्यान चंद्रकात खैरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन टीका केली. 


"आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण, मुख्यंमत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय?  त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्वस्त केलं. ते शिवसैनिकांसाठी नाही, तर सोनियाजींना खूश करण्यासाठी" असं म्हणत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. 


मुख्यमंत्र्यांची 8 जूनला सभा


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 जूनला सभा घेणार आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली.


मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा 8 जून 1985 मध्ये स्थापन झाली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त या सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे मुख्यमंत्री या बैठकीत काय बोलतात आणि काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.