शिवसेनेला अच्छे दिन, विधानपरिषदेत संख्याबळ वाढणार!
शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ एकदम चार संख्येने वाढणार आहे.
मुंबई : शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. त्याप्रमाणे सध्या शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहे. आधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. दोन नंबरवर राहत भाजपला जोरदार टक्कर दिली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार दिले आणि काही उमेदवार निवडणूनही आणले. त्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक उंचावलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले विधान परिषदेतील संख्याबळ दोनने वाढवले होते. यावेळी एक सदस्य निवृत्त होत असताना दोन नवे सदस्य निवडून आले आहेत.
दरम्यान, जुलै महिन्यात विधानसभेतून विधान परिषदेत पाठवण्यात येणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेनेचा एकच सदस्य आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार शिवसेनेच्या दोन जागा सहज निवडून येतील. यामुळे जुलैअखेर शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ एकदम चार संख्येने वाढणार आहे. अर्थात शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ १३ होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार आणि जिंकूनही दाखवणार, अशी घोषणा केली. स्वबळावर निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेनेने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पुन्हा बाजी मारली आहे. चारपैकी दोन जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबईची जागा कायम राखतानाच नाशिकची जागाही शिवसेनेने खेचून आणली आहे. दरम्यान, भाजपला कोकणातील एक जागा मिळवता आली.
गेल्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या सहा जागांसाठी निवडणूक झाली. यातील एकही जागा शिवसेनेकडे नव्हती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळवला. नाशिकची जागा राष्ट्रवादीकडून खेचून आणत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. तसेच सर्व समीकरणे प्रतिकूल असतानाही परभणीची जागा जिंकत शिवसेनेने मोठा धक्का दिला. येथून शिवसेनेचे विप्लव बजोरिया जिंकून आले.