मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या अजित पवार यांच्यावर शिवसेनेने शेलक्या शब्दांत टीका केली आहे. अजित पवारांची खोपडी रिकामी आहे. शरद पवारांच्या आधाराविना ते केवळ राजकारणातील एक गटारी किडा आहेत, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवार यांनी या घोषणेची खिल्ली उडविली होती. उद्धव ठाकरेंना स्वत:च्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही. ते अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार, अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली होती. 


या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने अजित पवार यांच्या अब्रुची अक्षरश: लक्तरे काढली आहेत. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे. 


अजित पवार यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रणाच्या छंदाचीही खिल्ली उडवली होती. त्यालाही अग्रलेखातून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. 


मात्र, अजित पवार या गटारी किडय़ाचे नेमके काय छंद आहेत व त्या छंदांसाठी त्याने साताऱ्यात काय रेशमी उद्योग सुरू केले त्याविषयी इत्थ्यंभूत खबरबात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले देऊ शकतील, अशी जहरी टीकाही शिवसेनेने केली आहे. 


त्यामुळे आता अजित पवार या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.