मुंबई : शिवसेनेतर्फे येत्या १४ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विराट सभेला संबोधित करणार असून, या सभेचा एक 'टिझर' आज शिवसैनिकांनी व्हायरल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार याची झलक या टीझरमधून पाहिला मिळतेय. भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुद्देसुद उत्तर देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केल्याचं या टीझरमध्ये पाहिला मिळतंय.


व्हायरल टीझरमध्ये काय?
हो आम्ही मराठीच, आम्हीच महाराष्ट्रीय, आम्हीच मुंबईकर... आणि कायम गर्वाने हिंदू. हे सर्व आम्हाला भोंगे लावून, भगव्या शाली पांघरुन मोठ्या आवाजात रेकून सांगावं लागत नाही. डोस घ्यायचा सोस असेल तर ठोस सांगतो, नकली हिंदुत्ववाद्यांना आरसा आणि हिंदुहृदयसम्राटांचा वारसा दाखवायला येत आहोत, महामेळावा मुंबई... बुस्टर नाही मास्टर.. १४ मे बीकेसी.


हिंदुत्व सभेचं मुख्य आकर्षण
हिंदुत्त्वाचा मुद्दाच या सभेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. आगामी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेच्या माध्यमातून शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.


शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार येत्या 14 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता बीकेसी येथे ही सभा घेतली जाणार आहे.