भाजपचं प्रोटोकॉलचं नाटक, शिवसेनेला डावलण्याचा हा जुनाच डाव - निलम गो-हे
शिवसेना नेत्या निलम गो-हे यांच्या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार असून त्यानिमित्ताने त्यांनी भाजपवर आणि शिवसेनेच्या वेगवेगळ्या भूमिकांवर भाष्य केलंय.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई : शिवसेना नेत्या निलम गो-हे यांच्या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार असून त्यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपकडून शिवसेनेला मिळत असलेल्या वागणुकीवरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपच्या अनेक भूमिकांवर यावेळी जोरदार हल्ला चढवला.
शिवसेनेला डावलण्याचा डाव जुनाच
त्या म्हणाल्या की, शिवसेनेला जाणवण्यासाठी प्रोटोकॉलचं नाटक केलं जातं. शिवसेनेला डावलण्याचा हा प्रकार आहे. हा डाव नव्याने घडला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जलपूजन कार्यक्रमालाही आम्हाला डावलण्यात आलं होतं. हा श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेने रायगडमध्ये आंदोलन करून नाराजी व्यक्त केली आहेच.
प्रोटोकॉलचं नाटक
शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी प्रोटोकॉलचं केलं जाणारं अवडंबर हे एक नाटक आहे. प्रोटोकॉलमध्ये नीरव मोदी बसतो. शिवसेनेबाबत सरकारकडून संकुचित आणि तकलादू भूमिका घेतली जात आहे.
नाणार प्रकल्पाबाबत
नाणारमधील लोकांचे मन वळण्याबाबत मुख्यमंत्री बोलतायत. धर्मा पाटलांचं मन वळवल़ असतं तर त्यांचा जीव गेला नसता. तीन वर्ष मन वळवलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
मॅग्नेटिक महाराष्ट्र
आधीच्या १० वर्षाचा आढावा घेतला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अनेक करार झाले. या सगळ्यांचा आढावा घ्यायला हवा.
शेतक-यांना न्याय नाहीच
पंचनामे करण्यासाठी शेतक-यांना गळ्यात पाट्या घेऊन उभे केले होते. ते करायला नको होते. २०१७ च्या गारपीटचे शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. तेव्हाही पंचनामे केले होते, पण पैसे मिळालेच नाही. विमा कंपन्यांना वाचवण्यासाठी कमी नुकसान दाखवले जाते.
निलम गो-हे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
‘शिवसेनेतील माझी २० वर्ष’ या निलम गो-हे यांच्या पुस्तकाचे उद्या दुपारी १२ वाजता उद्घव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे प्रकाशन होणार आहे.