...तर मंत्रिमंडळात `ईडी`चा एक प्रतिनिधी सामील करावा लागेल- संजय राऊत
संजय राऊत यांनी सरकार स्थापनेसाठी महाराष्ट्रात काय घडू शकते, याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना कमालाची आक्रमक झाली असून दररोज भाजपला नवे इशारे दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जळजळीत टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त संजय राऊत यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे.
या लेखात राऊत यांनी सत्ता स्थापनेच्या वेगवेगळ्या शक्यता नमूद केल्या आहेत. यापैकी एका शक्यतेविषयी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, भाजपला ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन करावे लागेल. त्यासाठी मंत्रिमंडळात 'ईडी'च्या एका प्रतिनिधीला सामील करावे लागले, असा सणसणीत टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी सरकार स्थापनेसाठी महाराष्ट्रात काय घडू शकते, याचा अंदाज वर्तवला आहे. ते पर्याय खालीलप्रमाणे.
१. शिवसेनेला वगळून सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतो. भाजपकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे, बहुमतासाठी आणखी ४० आमदारांची गरज आहे. ते शक्य न झाल्यास विश्वासदर्शक ठरावाच्यवेळी त्यांचे सरकार कोसळेल. सध्याच्या घडीला अतिरिक्त ४० आमदारांचे संख्याबळ जमवणे अशक्यच दिसते.
२. २०१४ प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला पाठिंबा देईल. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात तर अजित पवारांना राज्यात पद दिले जाईल. पण २०१४ साली केलेली घोडचूक श्री. पवार पुन्हा करण्याची सुतराम शक्यता नाही. पवारांना भाजपविरोधात यश मिळाले असून महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले आहे. आज ते शिखरावर आहेत. भाजपला पाठिंबा दिल्यास त्यांच्या यशाची माती होईल.
३. भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यास दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४ व इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा १७० पर्यंत जाईल. याठिकाणी मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल. मात्र, त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल.
४. भाजप आणि शिवसेना यांना नाईलाजास्तव एकत्र येत सरकार स्थापन करावे लागेल. त्यासाठी दोघांनाही चार पावले मागे यावे लागेल. भाजपला शिवसेनेच्या मागण्यांचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्रीपदाची विभागणी करावी लागेल व हाच उत्तम पर्याय आहे. पण अहंकारामुळे ते शक्य नाही.
५. ईडी, पोलीस, पैसा आणि धाकाचा वापर करून भाजपला इतर पक्षांतील आमदार फोडावे लागतील. (त्यासाठी 'ईडी'चा एक प्रतिनिधी मंत्रिमंडळात सामील करावा लागेल.) पण पक्षांतर करणाऱ्यांची काय अवस्था झाली हे मतदारांनी दाखवून दिल्यामुळे फाटाफूट घडवून बहुमत मिळवणे, मुख्यमंत्रीपद मिळवणे सोपे नाही. या सगळ्याचे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे भंजन होईल.