मुंबई: राजकीय नेत्यांच्या कार्यालयात आपल्याला अनेकदा महापुरूष किंवा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या तसबिरी पाहायला मिळतात. मात्र, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यालयात चक्क आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट केलेल्या एका छायाचित्रामुळे ही गोष्ट समोर आली. हे छायाचित्र सुभाष देसाई यांच्या कार्यालयातील आहे. यामध्ये भिंतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या तसबिरी दिसत आहेत. हा प्रकार पाहून अनेकांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुभाष देसाई शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. मातोश्रीशी असणारी त्यांची जवळीक कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेत असताना सुभाष देसाई यांना कायमच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. अर्थात यासाठी सुभाष देसाई यांच्या ठाकरे घराण्याशी असणाऱ्या निष्ठेचा खूप मोठा वाटा आहे. 


यापूर्वी सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सुरुवातीच्या काळात राजकारणाचे धडे गिरवण्यास मदत केली होती. मात्र, हा फोटो पाहून सुभाष देसाई ठाकरे घराण्याच्या पुढच्या पिढीशीही तितकेच एकनिष्ठ असल्याचे दिसत आहे. 



आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात बस्तान बसवले होते. यंदा त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवून नवा इतिहास रचला. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती आहेत. आदित्य यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मतदारसंघ निवडण्यापासून प्रत्येक स्तरावर विशेष रणनीती आखली होती. अखेर वरळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होत ते विधानसभेत दाखल झाले आहेत.