मुंबई : आमदार रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. पहाटे विमानाने राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी मोठी फिल्डींग लावली होती. पण शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालंय. सकाळी साडेसहा वाजता इंडिगो फ्लाईटने ते मुंबईत दाखल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार नवनीत राणा वाय प्लस सुरक्षा व्यवस्था न घेताच मुंबईत दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्राकडून सुरक्षा देण्यात आली होती. हिंमत असेल तर सुरक्षेविना या असं आव्हान शिवसैनिकांनी दिलं होतं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी अमरावतीतच शिवसैनिकांनी फिल्डिंग लावली होती. राणांना कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जाऊ देणार नाही, हिंमत असेल तर सुरक्षेशिवाय जाऊन दाखवा असं आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आज राणा दाम्पत्य हे अमरावतीहून मुंबईला आलं आहे. मात्र यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


'राणा दाम्पत्य मुंबईत येऊ दे. आम्ही त्यांचं योग्य ते स्वागत करू असा इशारा युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी दिला आहे. आम्ही मातोश्रीसमोर आहोत. राणा आले तर त्यांना योग्य तो धडा देऊ असं सरदेसाई म्हणाले.