मुंबई: मराठा आरक्षणासाठीचे रस्त्यावरील आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले असले तरी आता यावरुन आता मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा आहे. त्यापाठोपाठ काहीवेळातच वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा देणार असल्याचे सांगितले. वैजापूर येथील आंदोलनादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. ते उद्या विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील. भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे आता उर्वरित मराठा आमदार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या राजीनाम्यांमुळे सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाब वाढू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेलाही सुरुवात झाल्याचे बोलले जाते. असे झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणात मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात. 



दरम्यान, काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन प्रसिद्ध करून मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली.


सकल मराठा समाजाने हिंसा किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास सरकार सदैव तयार आहे, असे त्यांनी सांगितले.  मात्र, यानंतर परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीनच चिघळताना दिसत आहे.